साजवार्ता
Page No.: 3 Date: 29/11/2026
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी येथील नवनिर्मित ४०० खाटांच्या महिला रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयाच्या पायाभूत सुविधा, बांधकामाची सद्यस्थिती तसेच भविष्यात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचा आढावा घेतला.
यावेळी आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. कांचन वानेरे, सहाय्यक संचालक हिवताप डॉ. रेखा भंडारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रुग्णालयात सर्व प्रकारच्या आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासह सुपर स्पेशालिटी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्याचे निर्दे श आरोग्य मंत्री आबिटकर यांनी यावेळी दिले. कोल्हापूर येथील रुग्णालयाच्या
धर्तीवर या रुग्णालयाचेही स्वरूप सुपर स्पेशालिटी असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यानुसार कॅथलॅब यांसारख्या अत्याधुनिक सुविधांचाही समावेश करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.
रुग्णालयाच्या कामाचे स्वरूप, प्रशासकीय मान्यता, जागेची उपलब्धता, कंत्राटदाराकडून कामाचे हस्तांतरण तसेच आवश्यक मनुष्यबळ याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक पदांची भरती राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले. रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त सुविधा व सेवांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी मागणी सादर करावी. महिलांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून सुपर स्पेशालिटी उपचार उपलब्ध झाले पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
कॅथलॅबाबत निष्काळजीपणा खपवून घेणार नाही
मंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे अनपेक्षित भेट देऊन रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा, वैद्यकीय सुविधा, औषधांचा साठा, औषधांची गुणवत्ता तसेच उपचार व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. रुग्णालयातील कॅथलॅब सुविधेबाबतही आबिटकर यांनी विशेष लक्ष देत संबंधित यंत्रणेला स्पष्ट सूचना दिल्या. या सुविधेचा रुग्णांना प्रभावीपणे लाभ मिळाला पाहिजे. कॅथलॅबच्या कामकाजात कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
औषध भांडारची पाहणी
कर्करोग रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करून संबंधित यंत्रणेला आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर औषध भांडाराची पाहणी करून औषधांच्या उपलब्धतेची तसेच गुणवत्तेची माहिती घेतली. रुग्णालयात आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. औषधांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये. रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्याची वेळ येऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














